महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंची उद्या खेडमध्ये तोफ धडाडणार; पदाधिकारी-मतदारांचे मनोबळ वाढण्याचा प्रयत्न - शिवसेना पक्ष

शिवसेना पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांची खेडमध्ये रविवारी विराट सभा होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंची पहिली सभा असून यावेळी रामदास कदम आणि बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा चांगलाच समाचार यावेळी घेण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Sabha
उद्धव ठाकरे

By

Published : Mar 4, 2023, 1:52 PM IST

मुंबई :कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशातच शिवसेना चिन्ह आणि पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केला. त्यामुळे ठाकरेंनी सत्तासंघर्षाबरोबरच पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जोर बैठका सुरू आहेत. आता उद्धव ठाकरे थेट मैदानात उतरून बंडखोर आमदारांचा समाचार घेणार आहेत. जुन्या शिवसैनिकांना साद घालणार आहेत.




खेडमध्ये सेनेची ताकद जास्त :खेडमध्ये सेनेचे प्राबल्य आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम शिंदे गटात गेल्यानंतर ही येथील शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. मात्र, आगामी निवडणुकीच्या तोंडावर आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. पदाधिकारी आणि मतदारांमधील संभ्रम दूर करण्यासाठी आणि त्यांचे मनोबळ वाढण्यासाठी उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, रामदास कदम यांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडलेले माजी आमदार संजय कदम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा घरवापसी करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या या सभेकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सभेसाठी सूचना जारी : खेड हा आपला मतदारसंघ आहे. तो आपलाच राहिला पाहिजे. या मतदारसंघात होणाऱ्या सभेला मैदान अपुरे पडेल, एवढी गर्दी होईल,असे नियोजन करा, अशा सूचना करण्यात आल्या हेत. त्यानुसार येथील सभेची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या सभेच्या मैदानाची नुकतीच पाहणी केली. तिथल्या एकूण परिस्थीतीचा आढावा घेतला. येथील सभेची जवळपास तयारी पूर्ण झाली आहे.


असा असेल दौरा : सकाळी दहा वाजता पवनहंस येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी खेड येथे ते जातील. अकरा वाजता भरणे नाका येथे पोहोचतील. तेथून माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ते रवाना होतील. सायंकाळी साडेपाचला खेडमधील गोळीबार मैदानावर सभेला संबोधित करतील. सभा संपल्यानंतर पुन्हा ते आमदार वाईकर यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. शिवसैनिकांची गाठभेट आणि बैठक यावेळी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता खेडवरून मुंबईकडे येण्यास निघतील.

हेही वाचा :Antony Blinken In Auto : अँटोनी ब्लिंकनने केली ऑटोची सवारी! म्हणाले, अजून काही दिवस भारतात राहायचे आहे

ABOUT THE AUTHOR

...view details