मुंबई sharad pawar and Adani Friendship: मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट) शिवालय या कार्यालयाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, मुंबईतील धारावी प्रकल्प रद्द व्हावा, या मागणीसाठी 16 डिसेंबरला धारावीपासून अदानींच्या कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला फक्त आणि फक्त गौतम अदानीच (Gautam Adani) दिसत आहेत, अदानींच्या समोर बाकी कोणीच दिसत नाही. देश आणि राज्यातील मोठ्या प्रकल्पांचे काम केवळ गौतम अदानींनाच मिळत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
ठाकरे गट अदानींच्या विरोधात आक्रमक : 16 डिसेंबरच्या मोर्चात महाविकास आघाडीतील पक्ष सहभागी होणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता, मी सर्वांना आवाहन करत आहे, यात कोणीही, सामान्य मुंबईकर देखील मुंबईला वाचविण्यासाठी सहभागी होऊ शकतो, असं ठाकरेंनी सांगितलं. दुसरीकडे ठाकरे गट अदानींच्या विरोधात आक्रमक झाला असताना, शरद पवार (sharad pawar) हे अदानींच्या बाबतीत मवाळ भूमिका घेत असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून आलं आहे. त्यामुळं अदानी प्रकरणावरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मतभेद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
अदानींबाबत पवारांची सॉफ्ट भूमिका: आपण अदानींच्या विरोधात मोर्चा काढत असताना, दुसरीकडे शरद पवार यांची भेट गौतम अदानींनी घेतली. हिंडेनबर्ग अहवालाबाबत देखील पवारांनी अदानींचे समर्थन केले. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळं तुमच्या मोर्चाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? किंवा त्यांचा पक्ष मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता, धारावी प्रकल्पाबाबत माझ्या पक्षाची भूमिका मांडली, शरद पवारांची वेगळी भूमिका असू शकते. किंवा कुणाची कोणी भेट घ्यायची हा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणाचं ऐकणार नाही, अयोग्य आहे त्यावर आवाज उठवला पाहिजे, माझं या बाबतीत देणंघेणं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि अदानींच्या मैत्रीवरून स्पष्ट भूमिका मांडली. मात्र अदानीवरुन मविआमध्ये मतभेद असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय. शरद पवार अदानींची पाठराखण करत आहेत, असे तर्कवितर्क काढले जात आहेत. किंवा अदानींबाबत पवारांची सॉफ्ट भूमिका असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
मतभेद होणार नाहीत: अदानी प्रकरणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा असताना, दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र दोन नेत्यांमध्ये मतभेद नसल्याचं म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते मोठे आणि प्रगल्भ आहेत. अदानींसारख्या विषयावरून दोघांमध्ये मतभेद होतील असे मला वाटत नाही, असं ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी म्हटलंय. दुसरीकडे जर गौतम अदानी शरद पवारांना भेटत असतील तर शरद पवार यांची अनेकजण भेट घेत असतात. त्यामुळे अदानी शरद पवारांना भेटले, यातून वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे. किंवा आम्ही धारावीच्या प्रकल्पाविरोधात मोर्चा काढतोय म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद होतील, असं मला बिल्कुल वाटत नाही, असं ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी म्हटलंय.