मुंबई: निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव शिवसेना तसेच पक्षाचे चिन्ह धणुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे कायम ठेवले आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या निकालावरून जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमाणपत्रांचा खटाटोप कशासाठी: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित होता. हाच निर्णय द्यायचा होता, तर सुरुवातीला द्यायचा. प्रमाणपत्र मागवण्याचा खटाटोप कशासाठी केला, असा सवाल ठाकरे यांनी आयोगाला विचारला आहे. शिंदे गटावरही यावेळी जोरदार हल्लाबोल चढवला.
न्याययंत्रणा ताब्यात घेण्याचे प्रयत्न: निवडणूक आयोगाच्या निकालावरून हेच दिसून येते की, न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. मी निवडणुका घेण्याचे आव्हान केले आहे. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल गुलामशाहीतून दिलेला आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुखाचा धनुष्यबाण माझ्याकडेच: शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच आहे. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. चोरी पचली तरी चोर चोरच असतो तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या, शिवसैनिकांनो खचून जाऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने शेण खाल्ले: ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणूक आयोग गडबड करणार आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या प्रकरणावर जगाचे लक्ष आहे. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य आहे. यामुळे परकीय गुतंवणूकदार पण याकडे बघत आहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड आपण बघत आहोत. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने. निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले, अशी खोचक प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे.