मुंबई - अमित शाहंसोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या खोलीत चर्चा झाली होती. पद आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप, असे त्यावेळी ठरले होते. मात्र, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे मी जाणीपूर्वक मुख्यमंत्र्यांचे फोन उचलले नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने ठरवावे त्यांना खरे बोलणारे हवे की, खोटे बोलणारे सरकार हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
विधानसभा निकालानंतर अमित शाहांचा फोन नाही -
लोकसभा निवडणुकीला अमित शाहांचा अनेकदा फोन आला. मात्र, यावेळी त्यांनी एकदाही फोन केला नाही. १२४ जागा स्वीकारल्या हा माझा गुन्हा आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणाले आमच्यासोबत 'ते' होते की नाही माहिती नाही. आम्ही सोबत नसतो तर कामे झाली असती का? असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना पक्षप्रमुखांवर खोटारडेपणाचा आरोप केला. याचे दुःख झाले आहे. अमित शाहांचा संदर्भ घेऊन फडणवीसांनी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर खोटे आरोप केले असल्याचे ठाकरे म्हणाले.
भाजपचे पर्याय समोर आल्यानंतर शिवसेनेचे पर्याय दाखवू -
बहुमत नसताना सरकार आमचेच येणार, आमच्यापैकी कोणाचीही मदत न घेता सरकार आणून दाखवा. तुमच्याकडे इतर पर्याय असतील, तर आमच्याकडे पर्याय असणे काय चुकीचे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा, नाहीतर पर्याय खुले आहेत, असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे. भाजपकडून त्यांचे पर्याय समोर येऊ द्या, मग आम्ही आमचे पर्याय दाखवू, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.