मुंबई- दिल्ली विधानसभेच्या निकालावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. आपण म्हणजे देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला असल्याचे त्यांनी म्हटले.
केजरीवालांनी 'जन की बात' देशाला दाखवून दिली, ठाकरेंचा भाजपला टोला
दिल्लीतील जनतेने आता देशात 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून भाजपने सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ूसमोर टिकाव लागला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीतील जनतेने 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून भाजपने सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाडूसमोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून अरविंद केजरीवाल यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना करत स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणला. मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुनसुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजीत करू शकले नाहीत, असे ठाकरे म्हणाले.
"दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभा राहिली आणि जनतेने लोकशाहीवरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा" असेही उद्धव ठाकरे म्हणाले.