मुंबई : शिवसेना (UBT) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दोघांची ही पहिलीच भेट होती. (Uddhav Thackeray Met Ajit Pawar ) आज उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्यासोबत अडीच वर्षे काम केल्यामुळे त्यांचा स्वभाव माहीत आहे. तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे असल्याने नागरिकांचे प्रश्न सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधत होते. राज्य विधान परिषदेच्या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी ठाकरे कामकाजात सहभागी झाले होते.
तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे : उद्धव ठाकरेंनी मोठे वक्तव्य करून अजित पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत मी अडीच वर्षे काम केले आहे, त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. इतरांनी सत्तेसाठी धाव घेतली तरी, अजित पवार जनतेला मदत करतील याची मला खात्री आहे. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा त्यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते जनतेचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.