मुंबई Uddhav Thackeray Maha Press Conference : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल नुकताच लागला होता. हा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळं ठाकरे गट आक्रमक होत या निकालाविरोधात मुंबईत 'महापत्रकार परिषद' घेत राहुल नार्वेकरांची पोलखोल केली. 'जनता न्यायालय' असं नाव या महापत्रकार परिषदेला देण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, कायदेतज्ञ असीम सरोदे, अनिल परब यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
शिवसेना चोरांच्या हातात दिली : यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली. हा निकाल 'त्यांच्या' पत्नीलासुद्धा मान्य नसेल, असं राऊत यावेळी म्हणाले. जनता न्यायालयाची सुरुवात होत आहे. शिवसेनेच्या आमदार निकालासंदर्भात जनता न्यायालयाचं आयोजन केलंय. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. त्याविरोधात राज्यभर त्यांच्या अंत्ययात्रा निघाल्या. तसंच लवादानं शिवसेना चोरांच्या हातात दिली, असं म्हणत संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांवर जोरदार टीका केली.
न्यायालयात उत्तम लढाई लढलो : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या लवादानं चोरांच्या हातात दिली. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण आहे. आम्ही न्यायालयात उत्तम लढाई लढलो आहोत. या प्रकरणासंदर्भात आम्ही उत्तम लढा दिला आहे. तुम्ही बेईमानी करून हा निकाल जिंकलात, त्याविरोधात आम्ही जनता न्यायालय आयोजित केलाय. या न्यायालयात जनता जो निकाल देईल, तोच निकाल आगामी निवडणुकात दिसेल, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
तत्कालीन राज्यपाल फालतू माणूस : विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय घटनेला धरून नसल्याचा आरोप कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केलाय. तसंच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या तत्वाचं पालन केलं नाही. त्यांनी कायद्याला डावलून आमदार अपात्रतेचा निर्णय दिलाय. त्यामुळं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं सरोदे यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील टीका केलीय. राज्यपाल आतापर्यंत महाराष्ट्राला लाभलेले सर्वात फालतू माणूस असल्याचं सरोदे यांनी म्हटलंय. तसंच सरकार पाडण्यात त्यांची भूमिका असल्याची टीका त्यांनी कोश्यारी यांच्यावर केलीय.
अनिल परब यांनी सादर केले पुरावे : 1999 नंतर शिवसेनेची एकही घटना आमच्याकडं रेकॉर्डवर नाही. त्या घटनेत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सर्वोच्च अधिकार होता. त्यानंतर कोणालाही अधिकार देण्यात आल्याची कोणतीही नोंद आमच्याकडं नाही. बाळासाहेब ठाकरे दिवंगत झाल्यानं विधिमंडळाचा पक्ष हा मूळ पक्ष आहे, असा विचार करून पक्ष, चिन्ह काढून टाकण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा पुनरुच्चार आपल्या निकालात नार्वेकरांनी केलाय. निवडणूक आयोगात प्रकरण सुरू असताना निवडणूक आयोगानं ज्या गोष्टी मागितल्या होत्या, त्या आम्ही पूर्ण केल्या. मात्र, त्यांचा खोटारडेपणा जनतेच्या कोर्टात सिद्ध झाला पाहिजे. कारण सर्व पुरावे देऊनही निकाल आमच्याविरुद्ध आला आहे. त्यामुळं नेमकं काय झालं, हे लोकांना समजून घ्यावं लागेल, असं म्हणत अनिल परब यांनी सर्व पुरावे जनता न्यायालयात सादर केले.
हेही वाचा -
- 'राम जन्मभूमी'वरुन संजय राऊतांच्या सवालावर देवेंद्र फडणवीसांची जीभ घसरली, म्हणाले "मी मुर्खांना उत्तर देत नाही"
- "मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही, मला त्यात रस नाही", अयोध्या वादावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
- भारत जोडो न्याय यात्रेचा आज तिसरा दिवस, राहुल गांधींचं नागालॅंडमध्ये नागरिकांकडून स्वागत