मुंबई - मी सत्तेच्या सिंहासनावर बसणार नाही अशी प्रतिज्ञा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. पण, त्यांचेच पुत्र उद्धव महाराष्ट्राच्या सत्तेवर आरुढ होण्यास निघाले आहेत. नव्याने गठीत झालेल्या महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्रपदाचा उमेदवार घोषीत केले आहे. दहा वर्षांपूर्वी उद्धव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. आज तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.
उद्धव बाळ ठाकरे
जन्म - २७ जुलै १९६०
शिक्षण - सर जे. जे. आर्ट्स स्कूल
फोटोग्राफर उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. राजकारणात येण्याआधी एक गुणवान व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी नाव कमावले होते. उद्धव यांच्याकडे ही व्यंगचित्रकलेची कला तर आली नाही. पण, फोटोग्राफीचा त्यांना छंद आहे. ते उत्तम फोटोग्राफी करतात. महाराष्ट्र देश आणि पाहावा विठ्ठल ही फोटोग्राफीवरील त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या जिद्दीची कहाणी
उद्धव ठाकरे यांच्या चिकाटी आणि जिद्दीविषयी एक किस्सा सांगितला जातो. राज ठाकरे हे बॅडमिंटन खेळण्यात मोठे वाकबगार होते. एकदा त्यांनी आणि काही मित्रांनी उद्धवना खेळण्यासाठी बोलावले. उद्धवना बॅडमिंटन खेळण्यात स्वारस्य नव्हते. पण , ते आले. खेळता खेळता उद्धव पडले. तेव्हा सर्व मित्र त्यांना हसले. त्यानंतर उद्धव कधी खेळायला आले नाहीत.
सर्वांना वाटले की उद्धवना त्यांचा अपमान झाला असे वाटले असेल म्हणून ते आले नसावेत. पण, प्रकार काही वेगळाच होता. ज्या प्रशिक्षकाकडून राज प्रशिक्षण घेत असत त्यांच्याचकडून उद्धवनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि काही दिवसातच त्यांनी बॅडमिंटन खेळण्यात प्राविण्या मिळवले.