मुंबई : शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. शिवसेनेने सुरू केलेल्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टद्वारे ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. आता या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे या वर्षभरातील सर्वात मोठा राजकीय खुलासा करणार असल्याचा दावा या टीझरमध्ये करण्यात आला आहे. यासोबतच ते राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिसणार आहेत.
उद्धव ठाकरेंची मुलाखत :ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या टीझरमध्ये म्हटले आहे की, 'आवाज कुणाचा' या वर्षातील सर्वात मोठा खुलासा करणारी स्फोटक मुलाखत... लवकरच लाइव्ह एपिसोड. टिझरमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकमेकांसमोर बसलेले चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता या मुलाखतीत उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करू शकतात, असे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, अजित पवार यांचा शपथविधी, महाविकास आघाडीचे भवितव्य आणि काँग्रेससोबतच्या 'इंडिया' या नव्या आघाडीतील सहभाग या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे बोलणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 26 आणि 27 जुलै रोजी दोन भागात उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.
जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न : यात विविध राजकीय मुद्द्यांवर शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि चर्चेच्या माध्यमातून ठाकरे गट जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. या नव्या पॉडकास्ट सिरीजमध्ये संजय राऊत यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. पॉडकास्ट सध्या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा आणि शिवसेनेची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या आधीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी अनिल परब यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची सर्वत्र चर्चा झाली होती.