मुंबई:तुम्ही कोणालाही मत द्या, सरकार माझेच होणार, असे चित्र आहे. त्यामुळे ईव्हीएमची गरज राहिलेली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ते उद्धव ठाकरे गटाच्या आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये बोलत होते. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांनी उद्धव -राज ठाकरेंच्या युतीला कोणताही आधार नाही, असे सांगत राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी प्रस्ताव दिला तर त्यांना महाविकासआघाडीबाबत घेण्याबाबत चर्चा करेन. यापूर्वी प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा झाली आहे. भाजप विरोधकांना एकत्रित घेण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे. जागावाटपाचा तिढा सर्वांसमोरच आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरी केल्यानंतर शरद पवारांवर टीका केली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, की अजित पवारांचे शरद पवारांबाबतच्या निवृत्तीबाबतचे वक्तव्य चुकीचे आहे. राहुल गांधी हे समजुतदार नेते असून त्यांच्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मला संपवताय, मला संपवूनच दाखवा-पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, की भाजपला सत्तेची मस्ती आहे. मात्र, शक्तीबाबत आत्मविश्वास नाही. त्यामुळेच भाजप निवडणुका पुढे ढकलत आहे. दुसरीकडे भाजपला मुंबईचे महत्त्व कमी करायचे आहे. सर्व कार्यालये मुंबईबाहेर हलविली जात आहेत. व्यापारी वृत्ती मुंबईसाठी घातक आहे. मुंबई पालिकेत पालकमंत्र्यांसाठी कार्यालय कशासाठी? बिल्डरच्या हातात मुंबई कशासाठी? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. भाजपला शिवसेनेकडून मुंबई हिसकायवची आहे. मुंबईला भिकेचा कटोरा आणि दिल्लीसोर मुजरा करण्याचे षड्यंत्र आहे. हिंमत असेल तर शिंदे गटाने बंडखोरीबाबत खरे बोलावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले आहे.