मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनात पोहोचले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन आठवडा लोटला तरी उद्धव ठाकरे सभागृहात गैरहजर राहिल्याने भाजप तसेच सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांनी दबक्या आवाजात त्यांच्यावर टीका केली होती.
पुढील रणनीती आखणार : शिवसेना हे पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाणी हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानभवनात दाखल झाले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मागच्या महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयात फिरकलेच नाहीत. अधिवेशनाच्या काळात कामकाजात त्यांनी सहभाग घेतला नाही, असा आरोप सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप व शिंदे गटाच्या आमदारांकडून केला जात आहे.
उद्धव ठाकरे विधानभवनात :पक्षाच्या नव्याने उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या खेडमध्ये प्रचंड मोठी अशी सभा सुद्धा त्यांनी घेतली. त्याचबरोबर कसबा पोटनिवडणुकीत झालेला महाविकास आघाडीचा विजय त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे गटासाठी संजीवनी ठरला आहे. या सर्व घडामोडी पाहता रस्त्यावरील लढाई सोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी पुढची रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे आज विधान भवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात सर्व विरोधी पक्षांसोबत बैठकही घेतली.