मुंबई Uddhav Thackeray On CM : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण चांगलच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटम दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. तर दुसरीकडे मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची काही मराठा तरुणांनी तोडफोड केली. मनोज जरांगे पाटलांना अटकेची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर मराठा आरक्षणावरुन विविध प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य व केंद्र सरकावर टीका केली आहे.
फक्त शपथ घेऊन उपयोग काय :आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर इतर पक्षातील काही पदाधिकार व कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टिकास्त्र डागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागील वेळी उपोषण केलं तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देत, ४० दिवसांच्या आत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र ४० दिवस उलटूनही मराठा आरक्षणावर सरकारने कोणताच तोडगा काढला नाही. यावर उद्धव ठाकरेंनी टिका केली. तुम्ही जरुर शपथ घ्या, पण शपथ घेतल्यानंतर तसे वागा, किंवा त्यावर तसा मार्ग तरी काढा, फक्त शपथ घेऊन उपयोग काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.