मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि मुंबई महापालिकेचे तीन वेळा शिक्षण सभापती असलेले मंगेश सातमकर आणि माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेच्या शिंदे गटात प्रवेश केला. नरिमन पॉइंट येथील बाळासाहेब भवन येथे इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता या दोन्ही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी आपण मातोश्री सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे. मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उध्दव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
जे गेली आहेत त्यांना माझा जय महाराष्ट्र : मुंबईच्या सायन कोळीवाडा विभागाचे विभाग प्रमुख प्रमोद शेंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मातोश्री गाठली आणि आपण अजूनही पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. मातोश्रीवर कार्यकर्त्यांसमवेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यांना अजूनही तिकडे जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. ही लोक तिकडे गेल्याने आपल्या शिवसेनेच्या समुद्राला अधिक उधाण येत आहेत. यांच्या अशा वागण्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात राग आहे. चीड आहे, जिद्द आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातील आगामी सर्व निवडणुका जिंकण्याची इर्षाही तितकीच वाढत आहे. आता जी लोकं त्यांच्याकडे गेली आहेत त्यांना माझा जय महाराष्ट्र. फक्त तिकडे गेल्यावर घाण करू नका. नाहीतर शिवसैनिक काय असतो हे दाखवून द्यावे लागेल.