मुंबई Uddhav Thackeray On Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नावर आज भाष्य केलं. तसंच यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केलाय. विशेष म्हणजे राज्यात सध्या विविध शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले असून यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचाही समाचार घेतला आहे.
आरोग्य यंत्रणाचे तीन तेरा वाजले आहेत :याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मी फार व्यथित आहे. याचं कारण म्हणजे आरोग्य यंत्रणाचे जे काही तीन तेरा वाजलेत, ते बघितल्यावर फार संताप येतो. यापूर्वी महाराष्ट्रासह जगभरात कोरोनाचं संकट होतं. तेव्हा महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री होतो. आज मी मुख्यमंत्री नाही. सरकार महाविकास आघाडीचं नाही. परंतु महाराष्ट्रात आजही आरोग्य यंत्रणा तीच आहे. तेव्हा महाराष्ट्रातील दुर्गम भागामध्येसुद्धा कोरोनाची औषधं पोहोचवण्याचं काम आमच्या आरोग्य यंत्रणेनं केलं. लसीचा, औषधाचा, डॉक्टरांचा कुठेही तुटवडा नव्हता. तेव्हा परिचारिका, वॉर्ड बॉय यांचाही मृत्यू झाला. परंतु सरकार कुठेही मागे हटलं नाही. परंतु, आज शासकीय रुग्णालयांमध्ये सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. पण सरकार त्यावर काही बोलायला तयार नाही. आरोग्य मंत्री फक्त जाहिरातीत दिसत आहेत. त्यांच्याकडे औषधासाठी पैसे नाहीत, असे ठाकरे म्हणाले.
निःपक्षपातीपणे सीबीआय चौकशी व्हावी :पुढे ठाकरे म्हणाले की, एक फुल, एक हाफ दिल्लीमध्ये आहे. दुसरा हाफ कुठंय माहीत नाही. महाराष्ट्रात दुर्दैवी घटना घडत असताना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी नांदेडला जायला हवं होतं. परंतु नांदेडला एका गद्दार खासदारानं डीनला टॉयलेट साफ करायला लावलं. मग हेच कळवा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथे का केलं गेलं नाही? नांदेड येथे डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराची साथ सुरू आहे. आजाराची साथ कुठे दिसत नाही. निविदा प्रक्रियेशिवाय तुम्ही औषधं खरेदी करत आहात. म्हणून तुम्ही भ्रष्टाचाराला दार उघडं करून देताय. या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हायला हवी. खेकड्याने धरण फोडलं होतं. आता असे काही खेकडे आहेत की जे हे सर्व करताय. तसंच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावत ठाकरे म्हणाले की, स्वतःच्या जाहिराती करायला या सरकारकडे पैसे आहेत. या सरकारला खोके सरकार म्हणतात हे कशासाठी तर यांच्याकडे भरपूर खोके आहेत. गुजरात, गुवाहाटी, गोवा येथे मस्ती करायला यांच्याकडे पैसे आहेत. परंतु महाराष्ट्रात जीव वाचवायला औषधे खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. याची निःपक्षपाती सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.