मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) गोरेगाव येथे मुंबईत उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार सुनील प्रभू आदी शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना मार्गदर्शन करताना, आज तुमची साथ मागायला आलो आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून तुम्ही इथे राहत आहात. आपण एकमेकांना हिंदू असून मराठी आणि उत्तर भारतीय वेगळे नाहीत. ते भारतीय आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदू आणि मुस्लिम असा भेद केला नाही. देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना मग त्यांचा धर्म असो, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. आणि हे आमचे हिंदुत्व आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, मी त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवर विश्वास ठेवत नाही असे, म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रहार केला आहे. दरम्यान, भाजपने आजवर जाती-धर्मात द्वेषभावना निर्माण केली असही ते म्हणाले आहेत.
फक्त अशांनाच बाळासाहेबांचा विरोध: आजवर भाजपने द्वेषभावनेतून राजकारण केले आहे. गेल्या 25-30 वर्षांपासून आमची युती होती. आम्ही निभावली मात्र त्यांनी तोडली. आमची त्या पक्षासोबत आपुलकी होती, जसे केंद्रात जाऊन बसले तसे त्यांनी आम्हाला दूर लोटले, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच 95 पूर्वी शिवसेना आणि भाजपला कुणी साथ देत नव्हते. आमच्यावर धार्मिक असल्याचा ठपका ठेवला गेला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही उत्तर भारतीयांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष केला नाही. जो देशाच्या विरोधात होता, त्यालाच बाळासाहेबांनी प्रखर विरोध केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.