मुंबई - भाजपसोबतच्या तहामध्ये आपण जिंकलो आहोत. आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी लढत आहोत, त्यामुळे ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही, असे मत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. यातून त्यांनी नाराज शिवसैनिकांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे - bjp shiv sena alliance
अविचारी पक्ष एकत्र येतात मग समविचारी पक्षासोबत का जाऊ नये, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
आधी, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असा करार होता. मात्र, मी ते स्वीकारले नाही. मी समसमांतर आणले. आपले जे स्वप्न आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा, ते मी पूर्ण करणारच, असा आशावादही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. ईशान्य मुंबईतील जागा भाजपकडे असून तेथे सेनेच्या हिटलिस्टवर असलेले किरीट सोमैय्या खासदार आहेत. त्यांना मदत न करण्याची भूमिका शिवसैनिकांनी ठाकरे यांच्यासमोर मंगळवारी मांडली. यावेळी सैनिकांची समजूत काढताना, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसैनिकांना दिलासा देताना ठाकरे म्हणाले, की युतीच्या तहात आपण जिंकलो, आता निवडणुकीच्या युद्धात जिंकायचे आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी कामाला लागा.
मनसेमधून शिवसेनेत परतलेले शिशिर शिंदे यांनी ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांसह पक्ष प्रमुखांची भेट घेतली. यावेळी 'मी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला आहे का?' असा प्रश्न ठाकरेंनी विचारताच, एकसूराने शिवसैनिकांनी 'हो, शंभर टक्के' असे उत्तर दिले. अविचारी पक्ष एकत्र येतात मग समविचारी पक्षासोबत का जाऊ नये, असा प्रति सवालही त्यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसात भाजप नेतृत्वाकडून बदल अनुभवाला आला असून मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतच समान अधिकार आणि सत्तेचे वाटप होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा युतीचा तह आपण जिंकला की नाही, असेही ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून विचारले. आपल्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे, हे आपले स्वप्नाहे, त्या दिशेनेच पुढे निघालो असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.