मुंबई Maratha Reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील अंतरवली सराटी येथे दुसऱ्यांदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचं राज्यातील मराठा समाज स्वागत करत आहे. तसेच हा लढा अधिक तीव्र होत आहे.
ठाकरेंचा सरकारला सवाल : आता राज्यातील अनेक गाव-खेड्यात राजकीय नेते, पुढारी व मंत्री यांना गावप्रवेश बंदी केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरुन आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. यात शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर बोचरी (Uddhav Thackeray On Government) टीका केली आहे.
...मग आरक्षण काय कामाचे? : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावागावात पुढारी व नेत्यांना प्रवेश देऊ नका, पण उपोषण व आंदोलन शांततेच्या मार्गाने करा, असं मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) म्हटलं आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण करत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवं. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवं, असं पत्रकात म्हटलं आहे.
मृतदेहावर आरक्षणाचा आदेश ठेवणार का? : जरांगे-पाटील उपोषण करत आहेत. पण, आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार 'मन की बात' करत आहे. पण त्यांचे मन निर्दयी आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असं प्रसिद्धी पत्रकातून म्हणत सरकारला काही प्रश्न विचारत टीका केली आहे.
हेही वाचा -
- Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ
- Maratha Reservation : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवीगाळ केलेला मराठा तरुण 'ईटीव्ही भारत'वर; म्हणाला...
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक, अनेक नेत्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द; जाणून घ्या राज्यात कुठे काय परिस्थिती