मुंबई :हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती असून ज्या स्वप्नाची वाट महाराष्ट्राची जनता पाहत होती. ते आता पूर्ण होत आहे, याचा मला अभिमान आहे. देशाच्या हितासाठी आणि पुढची वाटचाल एकत्र लढण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आलो असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेत युतीवर शिक्कामोर्तब : आजवर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्यांनी दगा दिला. मात्र, फसवणूक करणाऱ्यांना पुरून उरून उरलो. हेतू चांगला असेल तर सगळे ठीक होते. आता राजकीय बापजाद्यानी हिंमत असेल आगामी निवडणूक घेऊन दाखवा, असे थेट आव्हान देखील ठाकरेंनी विरोधकांना देत ललकारले. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आज शिक्कामोर्तब करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ठाकरे बोलत होते.
एका स्वप्नाची पूर्ती : ऐतिहासिक घटना आज या ठिकाणी घडत आहे, याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. अनेक दिवस चर्चा सुरु होती. अनेक बैठका झाल्या. जे संकट पुढे ठेपले आहे यासाठी या युतीची घोषणा करत आहोत, असे सांगत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली. तर उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करताना, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आता देखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि आरएसएससह भाजपवर पत्रकार परिषदेत सडकून टीका केली.
हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल : उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र असून सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येणार आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी पुढील वाटचाल करण्यासाठी येथे आम्ही एकत्र आलो असून जे जीवाला जीव देणारे सहकारी आहेत, ते एकत्र आले आहेत, असे ठाकरे म्हणाले. तसेच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येत आहोत. घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी आम्ही आलो आहोत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. जे काही देशात चालले आहे, ते देशातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहचले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.