मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना त्या परीक्षा घरी बसूनच देता याव्यात, यासाठी त्यांना विविध प्रकारचे तीन पर्याय देण्यात येणार आहेत. हे पर्याय राज्यातील प्रत्येक विद्यापीठाने आपल्या निवडीनुसार स्वीकारावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज(शुक्रवार) केले. या परीक्षांचे वेळापत्रक 7 सप्टेंबर रोजी जाहीर केले जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत यांची माहिती अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात आज पुन्हा कुलगुरु आणि इतर तज्ज्ञांच्या सोबत एक बैठक घेतली गेली. उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ओपन बुक, एमसीक्यू, असाइनमेंट बेस अशा तीन पर्यायांच्या माध्यमातून घेतल्या जातील आणि हे पर्याय निवडीचे स्वातंत्र्य विद्यापीठांना असेल असेही ते म्हणाले. कुलगुरु समितीकडून सादर करण्यात आलेला अहवाल आज राज्यातील प्रत्येक विद्यापीठांना पाठवण्यात आला आहे. या अहवालावर संबंधित विद्यापीठाने तातडीने आपल्या परीक्षेच्या संदर्भात निर्णय घेऊन त्यासाठीची माहिती कळवावी, असे सांगण्यात आले असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आम्हाला कोणत्याही स्थितीत या परीक्षा पार पाडायच्या आहेत. काल राज्यपाल महोदयांनीसुद्धा विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त केली. यामुळे आता सोमवारी अथवा मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर, युजीसीला परीक्षेच्या काही तारखा आणि त्याची मुदत वाढ करून द्यावी अशी मागणी केली जाणार आहे, आणि त्यासाठीचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील आणि या सर्व प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी पद्धतीने घेतल्या जातील, याविषयी आमचा निर्णय झाला आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना लॅबमध्ये जाऊन ही प्रात्यक्षिक परीक्षा देण्याची गरज नाही असेही सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील विद्यापीठांमध्ये तब्बल सात लाख 92 हजार 385 विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने परीक्षा कशी देता येईल यावर आमचा भर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -NEET, JEE परीक्षा : 'त्या' सहा राज्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली