मुंबई: राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेला तोंड फोडले आहे. या संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, आरोग्य मंत्री तानाजी सावंत नेमके काय म्हणाले ते आपल्याला माहीत नाही. परंतु अशा पद्धतीच्या बैठकांची मला तरी माहिती नाही. ते वरिष्ठ नेते आहेत. यासंदर्भात अधिक माहिती हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतील, त्यामुळे याविषयी आपण बोलू शकत नाही. त्यामुळे या वादावर त्यांनी फार काही भाष्य करण्यास नकार दिला.
गद्दारांच्या मनातील भाव उघड:या संदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत की, म्हणजे या लोकांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच सरकार उलथवून टाकायचे होते. उद्धवजी भेटत नाहीत किंवा कामे होत नाहीत, हे केवळ त्यांचे नाटक होते. त्यांना हे सरकार उलथून टाकायचे होते. हे आधीपासूनच ठरलेले होते, हे तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांची नेमकी गद्दारी काय आहे? ते आता उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.