मुंबईUday Samant On Uddhav Thackeray :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेश राज्यातील निवडणुकीदरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी अयोध्येत राम लल्लांचं मोफत दर्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावर राज्यात विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडलंय. तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अमित शहांच्या आश्वासनावर आक्षेप घेतलाय. तर दुसरीकडं शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नितीश कुमारांच्या वक्तव्यावर ठाकरे गप्प :उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय. मात्र आठ दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत अश्लील वक्तव्य विधानसभेत केलं होतं. त्याबाबत उद्धव ठाकरेंनी कुठंही वक्तव्य केलेलं नाही. नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांचं मत का? व्यक्त केलं नाही, असं उद्योगमंत्री सामंत यांनी म्हटंलय.
निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल :पुढं बोलताना सामंत म्हणाले की, इंडिया आघाडीसोबत असलेले नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय पत्रकार परिषदेत काय बोलणार? याबाबत आम्हाला आगोदरच माहीत होतं. त्यांनी गृहमंत्र्याच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यास निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेल्या अश्लील वक्तव्याबाबत इंडिया आघाडीतील नेत्यांचं काय मत आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.