मुंबई - विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जपली पाहिजे. त्यांना स्वातंत्र्यावेळीच्या बलिदानाचे महत्व समजले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
एलफिन्स्टन महाविद्यालयात उदय सामंत यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण... हेही वाचा... 'उदगीर जिल्हा' निर्मितीच्या हालचालींना वेग ; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
मुंबई आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण, यांच्या संयुक्त विद्यमाने एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामंत बोलत होते.
चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्र्रगीत होत असते. देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे. आपल्या मातृभाषेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. सर्व महाविद्यालयाच्या नावाचे फलक हे मराठीतच लावावेत, अशा सूचनाही महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
हेही वाचा.... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उभारणार अंगणवाडी केंद्रांच्या इमारती
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची एलफिन्स्टन महाविद्यालयात पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. याच महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा पत्रकारितेचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल. तसेच महाविद्यालयाच्या सभागृहासाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीसाठी स्वतंत्र कुलगुरुंची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.