मुंबई -एकीकडेनागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. त्यात दुसरीकडे म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार कोरोनातून बरे झालेल्यांना होत आहे, असे आढळून येत आहे. राज्यात आतापर्यंत या आजाराने सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारांहून अधिक लोकांना या दुर्मिळ आजाराचा संसर्ग झाला आहे. काही रुग्णांना या आजारामुळे आपली दृष्टीही गमवावी लागली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.
हा आजार कसा संभावतो, त्याचा आणि कोरोनाचा संबंध काय?, याबाबत काय काळजी घ्यावी, उपचार कसे करावेत याबाबतही मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे -
म्यूकरमायकोसिस कशामुळे होतो? -
वातावरणातील बुरशीजन्य कणांच्या संपर्कात आल्याने लोकांना म्यूकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावर कापण्यामुळे, खरचटण्यामुळे, भाजण्यामुळे झालेल्या जखमेतून किंवा इतर प्रकारच्या त्वचारोगांमुळे झालेल्या जखमेतून या बुरशीचा शिरकाव झाल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो. आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या रुग्णांमधील अनियंत्रित मधुमेह आणि स्टेरॉईडच्या वापरामुळे रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होणे, अतिदक्षता विभागात, रुग्णालयात दीर्घकाळ दाखल असणे, अवयव प्रत्यारोपण ट्युमर, कर्करोग कारक पेशींची उपस्थिती यामुळे म्यूकरमायकोसिस संसर्गाचा धोका वाढू शकतो.
या रोगाचा आणि कोरोनाचा संबंध काय? -
म्यूकरमायकोसिस याला सामान्यपणे काळी बुरशीही म्हटले जाते. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे. सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्यूकर मायसेटीस या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो. म्युकरमायसेटीस मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात. कोरोनातून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना या बुरशीचा संसर्ग होत असल्याचे आढळत आहे.
कोरोना आणि मधुमेह झालेल्यांना आजाराची भीती -
केवळ कोविड रुग्णच नाही तर ज्यांना मधुमेह आहे, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशा लोकांनाही म्युकरमायकोसिस होऊ शकतो. आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती अशा बुरशीच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यास सक्षम असते. मात्र, कोविड रुग्णांवर उपचार करतांना रोगप्रतिकार दाबून टाकणारी डेक्समेथासोन सारखी औषधे असतात. या औषधांमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याशिवाय जे रुग्ण ऑक्सिजन आधारावर अतिदक्षता विभागात उपचार घेत असतात, तिथे या प्रणालीमध्ये ह्युमिडीफायर असते. यामुळे पाण्यातील आर्द्रतेतून बुरशी संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कोरोना रुग्णाला म्यूकरमायकोसिसचा धोका संभवतो. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. मात्र, त्याचवेळी जर त्यावर योग्य आणि वेळेत उपचार केले गेले नाहीत, तर तो प्राणघातकही ठरु शकतो.
आजाराची सामान्य लक्षणे काय आहेत? -
म्यूकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरू शकतो. या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात किंवा तेथील त्वचेचा रंग बदलतो. दृष्टी अधू होते, छातीत दुखू लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात. मात्र, नाक चोंदण्याच्या सगळ्याच रुग्णांना जिवाणूजुन्या सायनसिटीस झाला असावा, असे गृहीत धरु नये, असा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिला आहे. विशेषतः कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना किंवा झाल्यावर हे लक्षात घ्यावे. हा बुरशीसंसर्ग आहे का हे जाणून घेण्यासाठी, वैद्यकीय तपासणी आणि सल्ला घेणे उचित ठरेल.
त्यावर उपचार कसे करतात? -