मुंबई - शहरातील नालेसफाई व मलनिस्सारण वाहिनीचे काम करताना दुर्घटना होण्याच्या घटना होतात. सफाई कामगारांना मॅनहोलमध्ये उतरून सफाईचे काम करावे लागते. यावर उपाय म्हणून आता महानगरपालिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले दोन यंत्रमानव(रोबोट) आले आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून दोन रोबोट महापालिकेच्या एम पश्चिम चेंबूर विभागाला गुरुवारी हस्तांतरित केले.
मॅनहोलमध्ये उतरणारे हे रोबोट जमिनीखाली शंभर फुटापर्यंत खोल जाऊन मल निस्सारण वाहिन्या साफ करू शकतात. त्याचबरोबर नालेसफाई सुद्धा योग्य तऱ्हेने करू शकतात. मॅनहोल लाईनमध्ये उतरून सफाई करताना मिथेन आणि इतर घातक रासायनिक पदार्थांच्या वासामुळे कामगारांना जीव गमवावा लागत होता. या रोबोटमुळे मात्र, कामगारांना पाईप लाईनमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही.