मुंबई :मुंबईत घर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतीस भांडुप खिंडीपाडा येथून ही घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या पैकी दोन्ही व्यक्ती १८ ते १९ वयाचे युवक असल्याची माहिती आहे. पालिकेच्याआपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याआधी इमारती कोसळल्याच्या अनेक घटना मुंबईत घडल्या आहेत. अनेक जम यात जखमी झाले आहेत. काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.
दोन जणांचा मृत्यू : भांडुप खिंडीपाडा डंकन लाईन रोड, क्रांती मित्र मंडळ येथील तळ अधिक एक मजली घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्तीचे काम सुरू असताना या घराचा काही भाग कोसळला. यामुळे ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते. या दोघांना मुलुंड येथील एम टी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वी त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजकुमार धोत्रे (१९ वर्षे), रामानंद यादव (१८ वर्षे) अशी मृत युवकांची नावे आहेत.
घर कोसळण्याच्या घटना : २३ जानेवारी २०२२ रोजी कुर्ला एसबी बर्वे मार्ग, आंबेडकर नगर येथील पालिकेच्या अंजुमन इमारतीजवळ सकाळी १०.३० च्या सुमारास एका घराचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली एक महिला अडकली होती. तिला मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून कुर्ला नर्सिंग होम या रुग्णालयात दाखल केले. मात्र या महिलेचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या मृत महिलेचे नाव लता रमेश साळुंखे असून ती ५३ वर्षाची होती.