मुंबई- राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून मागणी केल्यास गृहमंत्रालय व रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यास आम्ही रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा सुरू करू, असे मध्य रेल्वेचे विभागी व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली. ते ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतील लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आल्यावर हार्बर मार्गावर प्रवासी भार वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी हार्बर मार्गावर उद्यापासून (दि. 28 ऑगस्ट) 2 अतिरिक्त लोकल सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक गोयल यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी क्यूआर कोड स्कॅनिंग मशीन बसविण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेच्या 15 स्थानकांवर क्यूआर कोड स्कॅनिंग मोबाईल अॅप लावण्यात आले आहे. या मोबाईल अॅपवरून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र स्कॅन करुन पाठवण्यात येईल.