मुंबई- सिनेमात काम मिळण्यासाठी अभिनेत्रींनादेखील संघर्ष करावा लागतो. हीच बाब हेरून अभिनेत्री क्रिसन परेराची फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही ठगांनी अभिनेत्रीला हॉलीवुडमधील वेबसिरीजमध्ये संधी मिळवून देतो, अशी बतावणी करत अभिनेत्रीला दुबईमधील शारजाहमध्ये ऑडिशनसाठी पाठविले. मात्र, तिला ऑडिशन दूरच अमली पदार्थ बाळगल्याने तुरुंगात जावे लागले आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १० क्रमांकाने अभिनेत्रीच्या आईने दिलेल्या तक्रारीचा सखोल तपास केला. तेव्हा त्यांना रवी बोभाटे आणि अँथोनो पॉल यांनी अभिनेत्रीसह तिच्या आईची फसवणूक केल्याचा निष्पन्न झाले. रिअल इस्टेटच्या व्यवसायात भरपूर कमिशन देण्याचेही आरोपींनी अभिनेत्रीला आमिष दाखविले. क्रिसन परेराची ५६ वर्षीय आई परेरा यांनी गुन्हे शाखेकडे जात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. परेरा यांच्या तक्रारीनुसार बोभाटे याने वेबसिरीजचा फायनान्सर असल्याची दोघींना ओळख करून दिली होती. दुबई आणि भारतात काही कामे सुरू असून क्रिसनला वेबसिरीजमध्ये भूमिका देणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रिसनने हिंदी वेबसिरीज, सिनेमा आणि नाटकांमधून काम केले आहे. त्यामुळे त्यांना ही संधी योग्य वाटली.
ऑडिशनला गेली अन् अटक झाली-आरोपींसोबत अभिनेत्री व तिच्या आईची मिटिंग झाली. त्यानंतर विदेशात ऑडिशन घेणार असल्याचे आरोपींनी सांगितले. अभिनेत्री दुबईत जाणार असल्याचे ठरले होते. मात्र, अचानक विमान तिकीट शारजाहसाठी बुक करण्यात आले. ती १ एप्रिलला जाऊन ३ एप्रिलला परतणार होती. याचवेळी अभिनेत्रीच्या आईचा दुसरा आरोपी पॉलबरोबर रिअल इस्टेटमध्ये सौदा सुरू होता. अचानक परेरा यांना मुलीला शारजाहच्या विमानतळावर अटक झाल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तिच्याजवळ अमली पदार्थ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर परेरा यांच्या पायाखालची वाळू सरकली.