मुंबई - शासकीय यंत्रणेचा वापर करुन भाजप सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यामध्ये जे अधिकारी दोषी निघतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अनिल देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोन कॉल्स टॅपिंग झाले होते. असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर केला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेश सिंह यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या प्रकरणी तपास २ सदस्यीय समिती करणार आहे. समिती तांत्रिक तज्ञांची मदत घेऊन सखोल चौकशी करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
फोन टँप करण्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरसाठी पोलीस खात्याचे काही अधिकारी इस्त्रायलला जाऊन प्रशिक्षण घेऊन आले होते. चौकशीनंतर या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. सहा आठवड्यात समिती सखोल चौकशी करून त्यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे देशमुख म्हणाले.