मुंबई : हैद्राबाद येथे दोन लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यामधील एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ३ वर्षात २ लाख १४ हजार ९५० मुंबईकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
३ वर्षात २ लाख १४ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा :मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. कुत्र्यांचे भुंकणे, अंगावर धावून येणे, चावा घेणे यामुळे रात्री, मध्यरात्री नागरिक रस्त्यावर चालण्यास भितात. एखाद्या रस्त्यावर कोणीही नसल्यास त्या ठिकाणीही भटक्या कुत्र्यांची दहशत असते. २०२० मध्ये ५९ हजार ७९१, २०२१ मध्ये ६७ हजार १६६, २०२२ मध्ये ८७ हजार ९९३, अशा ३ वर्षात २ लाख १४ हजार ९५० मुंबईकरांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. विस्तारित लसीकरण कार्यक्रम विभागामार्फत १४७ लसीकरण केंद्रांवर कुत्रा चावल्यावर रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येते अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
इतक्या लसीचा साठा :कुत्रा चावल्यावर रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. गेल्या तीन वर्षात पालिकेच्या आरोग्य विभागाने रेबीज प्रतिबंधक लसीच्या एकूण २ लाख ९१ हजार ६६४ मागवल्या आहेत. २०२० मध्ये पालिकेने ७८ हजार १३, २०२१ मध्ये ९३ हजार ६८ तर २०२२ मध्ये १ लाख २० हजार ५८३ लसीच्या व्हायल्स मागवल्या होत्या. महापालिकेच्या लस भांडार केंद्रांमध्ये सध्या १९ हजार ५० व्ह्यायल्सचा साठा उपलब्ध आहे. मुंबई मधील १४७ लसीकरण केंद्रांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते अशी माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.