मुंबई :सिंघम सिनेमात दाखवलेला फिट अँड फाईन पोलीस सर्वांनाच आवडतात. मात्र रियल लाईफमधले पोलिसांना फिट राहण्यासाठी मिळणारा भत्ता ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. पोलिसांना तंदुरुस्ती भत्ता म्हणजेच फिटनेस अलाउन्सेस दिले जातात. त्याची सुरुवात 1985 मध्ये झाली. दर महिन्याला अडीचशे रुपये इतका तंदुरुस्ती भत्ता पोलीसांना दिला जातो. मात्र, 58 वर्षानंतरही पोलिसांच्या तंदुरुस्ती भत्यात वाढ झालेली नाही. ती फक्त अडीचशे रुपये इतकीच आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत इतक्या कमी भत्त्यात पोलीस कसे फिट राहणार असा प्रश्न उद्भवत आहे.
कागदपत्रांची यादी मोठी, पण भत्ता कमी : पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती, अर्ज यांची पडताळणी करण्यासाठी विशेष समिती असते. भत्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. आयुक्तांकडून अर्ज घेतल्यानंतर त्यात दिलेली सर्व माहिती अचूक भरायची असते. त्यामध्ये बॉडी मास इंडेक्सनुसार परिणाम असायला पाहिजे. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी केल्यानंतर अडीचशे रुपये वेतनात लागू करण्यात येतात. मात्र, हि मिळणारी तंदुरुस्ती भत्त्याची रक्कम कमी असून त्यामध्ये वाढ होणे गरजेचे असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
तंदुरुस्ती भत्ता अडीचशे रुपये :दिवसेंदिवस महागाई वाढत असून देखील तंदुरुस्ती भत्ता मात्र अडीचशे रुपये इतकाच असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. फक्त अडीचशे रुपयात तंदुरुस्त कसे राहायचे असा सवाल देखील काही पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्याने विचारला आहे. तंदुरुस्ती भत्ता तर वाढवला पाहिजेच तसेच पोलिसांना चांगले पगार दिले पाहिजे. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. भत्ताच नव्हे तर त्यांची घर चांगली असावीत. त्यांच्या मुलांची शिक्षण आणि सर्व सोयी पोलिसांना चांगल्या दिल्या गेल्या पाहिजे असे मत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी ईटीव्ही भारतकडे व्यक्त केले आहे.
पोलिसांमध्ये नाराजी :राज्य सरकारने 1985 पासून पोलिसांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन भत्ता देणे सुरू केले. त्यावेळी 250 रुपये दर महिन्याला मिळत होते. त्या काळात 250 रुपये म्हणजे समाधानकारक, खूप मोठी रक्कम होती. 250 रुपये हे पोलीस आपल्या सकस आहारावर खर्च करत होते. मात्र, आता 2023 मध्ये सुद्धा अडीचशे रुपये मिळत असल्याने पोलिसांमध्ये नाराजी आहे. त्यासाठी ही पोलीस मुख्यालयाकडून दरवर्षी सूचना पत्र काढण्यात येते. प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यात अर्ज बिन चूक भरून द्यावा लागतो, तेव्हाच त्यांना अडीचशे रुपये इतका तंदुरुस्ती भत्ता मिळतो.
हेही वाचा - Bombay High Court : महापालिकेच्या चुकीमुळे मुख्याध्यापकेची रक्कम कपात करता येणार नाही, न्यायालयाने महापालिकेला फटकारले