मुंबई - लालबाग गणेशगल्ली येथील साराभाई इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लग्नाच्या घरात जेवण बनवले जात असताना सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले होते. त्यामधील 10 जणांची प्रकृती गंभीर होती. रविवारी (दि. 6 डिसें.) रात्री केईएम रुग्णालयात सुशीला बागरे (वय 62 वर्षे) या महिलेचा तर मध्यरात्री करीम (वय 45 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. सध्या 9 जणांची प्रकृती गंभीर आहे.
नेमके काय घडले होते
लालाबाग गणेश गल्ली येथे सुप्रसिद्ध अशी साराभाई इमारत आहे. तळ मजला अधिक चार मजले, असे या इमारतीचे बांधकाम आहे. याच विभागात मुंबईमधील सुप्रसिद्ध असा गणेशगल्ली गणेशोत्सव साजरा केला जातो. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रविवारी (दि. 6 डिसें.) सकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. या घरात रात्रीपासून गॅस गळातीचा वास येत होता. सकाळी लग्नापूर्वी हळदीचे जेवण बनवण्यासाठी कामगार आणि लग्न घरातील काही लोक आले, त्यांनी गॅस पेटवल्यावर स्फोट होऊन आग लागली. इमारतीमधील काही घरांचे नुकसानही झाले.
दोन जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत इमारतीमधील 16 रहिवासी भाजले आहेत. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन 7 वाजून 50 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीमध्ये भाजलेल्या जखमींना जवळच्या केईम रुग्णलयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 12 जणांना केईएम रुग्णालयात तर 4 जणांना परेलच्या ग्लोबल रुग्णालयात उपचारानंतर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. केईएममध्ये दाखल असलेले 6 रुग्ण 70 ते 80 टक्के भाजलेले आहेत, तर मसिना रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले 4 जण 70 ते 90 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर 6 जण 30 ते 50 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती काल (रविवारी) रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. केईएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्यापैकी सुशीला बागरे (वय 62 वर्षे) या महिलेचा काल रात्री मृत्यू झाला आहे. तर मध्यरात्री करीम (वय 45 वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. करीम हा 30 ते 50 टक्केच भाजला होता. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरही त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. सध्या केईएम रुग्णालयात 5 व मसिना रुग्णालयात 4 अशा एकूण 9 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
जखमींची नावे
केईएम रुग्णालयात 12 जखमी उपचार घेत आहेत. यामध्ये विनायक शिंदे (वय 85 वर्षे), ओम शिंदे (वय 20 वर्षे), यश राणे (वय 19 वर्षे), मिहीर चव्हाण (वय 20 वर्षे), ममता मुंगे (वय 48 वर्षे) हे सर्व जण 30 ते 50 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे
प्रकृती गंभीर
केईएममध्ये प्रथमेश मुंगे (वय 27 वर्षे), रोशन अंधारी (वय 40 वर्षे), मंगेश राणे (वय 61 वर्षे), महेश मुंगे (वय 56 वर्षे), ज्ञानदेव सावंत (वय 85 वर्षे) हे सर्व 70 ते 80 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मसिना हॉस्पिटलमध्ये 4 जखमी उपचार घेताआहेत. यामध्ये वैशाली हिमांशू (वय 44 वर्षे), त्रिशा (वय 13 वर्षे), बिपीन (वय 50 वर्षे) सूर्यकांत (वय 60 वर्षे) हे सर्व 70 ते 95 टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा -मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; नवे 544 रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के
हेही वाचा -राज्यात ३ हजार ७५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ४० रुग्णांचा मृत्यू