मुंबई- आजपर्यंत आपण अस्मानी संकटे पाहिली, महापूर पाहिले, दुष्काळ सहन केला, डेंग्युसारख्या साथीही येऊन गेल्या. पण कोरोनाने आता जीवन-मरणाचा प्रश्न उभा केला आहे. या महामारीच्या संकटातून आपल्याला संपूर्ण समाजाला वाचवायचे आहे. हे खूप कठीण काम आहे. आपल्या वर्धापनदिनी आपण रक्तदान शिबीरांचे आयोजन करून गरज असलेल्या रुग्णांना मदत करुया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला उद्या दोन दशके पूर्ण होत आहेत.
शरद पवार यांनी एक निवेदन जारी करून हे आवाहन केले आहे. 'जगभरात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. आपल्या देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यातही आपल्या महाराष्ट्रावर या विषाणूने मोठा हल्ला केला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या प्रंचड वाढली. मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही मोठी आहे. मुंबईबरोबरच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीपासून थेट पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अकोला, अमरावती आणि नागपूरपर्यंत हा फैलाव वाढला. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरज असलेल्या रुग्णांना मदत करण्याचे आवाहन पवारांनी या निवेदनाद्वारे केले आहे.