मुंबई :शहरातील मुलुंड आणि भांडुप येथून अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अॅन्ड अॅनिमल वेलफेअर सोसायटी - मुंबई (पॉज-मुंबई) येथील स्वयंसेवकांच्या मदतीने दोन कॅमेलिओन (रंग बदलणारा सरडा) घोरपड, तीन भारतीय अजगरांची सुटका करण्यात आली. याबाबत मानद वन्यजीव रक्षक आणि एसीएफ पॉज-मुंबईचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यम यांनी माहिती दिली.
मुलुंड येथील राहणारे पवन शुक्ला यांच्या घराच्या बाजूला कॅमेलिओन (रंग बदलणारा सरडा) दिसून आला. त्यांनी त्वरित एसीएफ पॉज-मुंबईच्या स्वयंसेकाला माहीती दिली. यावेळी एसीएफ पॉज-मुंबईचे स्वयंसेवक हसमुख वळंजू यांनी घटनास्थळी दाखल होत कॅमेलियोन या रंग बदलणाऱ्या सरड्याला रेस्क्यू केले. तर, दुसरीकडे भांडुप येथील रहिवाशी रुपेश मिश्रा यांच्या घराच्या बाजूला झाडावर कॅमेलियोन दिसला, त्याला काही कावळे टोच मारत जखमी करत होते. दरम्यान याची माहिती मिळताच निशा कुंजू आणि हितेश यादव यांनी घटनास्थळी पोहोचून त्या कॅमेलियोनची सुटका केली. बोरिवली येथून किरण लाड यांच्या घरातून घोरपडची सुटका करण्यात आली. तसेच, दोन भारतीय अजगर मनीषा सावंत त्यांच्या घराच्या आवारामध्ये आढळले असता त्यांचीही सुटका करण्याचे काम एसीएफ पॉज-मुंबईचे स्वयंसेवक सिद्धेश ठावरे आणि अभिजीत सावंत यांनी केले.