मुंबई- उपनगरातील साकीनाका पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे दोन्ही नागरिक आपली ओळख लपवून शहरात राहात होते. रियाजउद्दिन मोहम्मद जैनाबुद्दिन (वय.२२ रा. बांगलादेश) व जाकीर हुसेन अब्दुल मतीन (वय.४५ रा. बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
साकीनाका पोलीस ७ तारखेला रात्रीच्या सुमारास गस्तीवर होती. त्यादरम्यान, पोलिसांना एक संशयित व्यक्ती काजूपाडा हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार साकीनाकाचे एटीएस पथक संबंधित इसमाच्या मागावर लागले. शोध घेत असताना रियाजउद्दिन मोहम्मद जैनाबुद्दिन हा युवक पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी या युवकाला विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उतरे दिली व पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशी केली असता, रियाजउद्दिनच्या मोबाईलमध्ये बांग्लादेशातील मोबाईल नंबर सेवा असल्याचे आढळून आले व हा व्यक्ती बांग्लादेशी असल्याचे स्पष्ट झाले.