मुंबई- राज्यातील भाजप सरकारच्या वतीने विधिमंडळात दुपारी २ वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
एनसीपीच्या अधिकृती ट्विटर हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये 'अर्थसंकल्पासाठी भाजप सरकारची तयारी जोरात... पाच वर्षे अभ्यास करून नवी आश्वासनांची गाजरे वाटली जाणार!' अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यावरून भाजपनेही ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या या ट्विटरवॉरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पावर निशाणा साधताना राष्ट्रवादीने मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडवणीस हे विधानसभेबाहेर गाजर विक्रतेच्या भुमिकेत दर्शविण्यात आले असून 'फेकूबाबा प्रसन्न, दाखवितो गाजरे आणि पारदर्शी फेकतो' अशी टीका केली आहे.
भाजपने या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घोटाळाबाबा प्रसन्न म्हणत भ्रष्टाचारी राष्ट्रवादीत फक्त घराणेशाही आणि जातीवाद मिळतो, असा टोला लगावण्यात आला आहे. तसेच यापूर्वी जशा पद्धतीने आश्वासनपूर्ती झाली तशी भविष्यातही होताना तुम्हाला झोंबत राहील, असा टोलाही लगावला आहे.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात दुपारी २ वाजता सादर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर केले जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत