मुंबई- नौदलाच्या मुंबईतील कुलाबा परिसरातील आयएनएस आंग्रे या प्रशासकीय इमारतीतून 26 खलाशांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या संदर्भात योग्य ती काळजी नौदलाकडून घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग जरी काही खलाशांना झाला असला तरी कोरोनाचे संक्रमण भारतीय नौदलाच्या कुठल्याही युद्ध नौकेवर किंवा पानबुडीवर झाले नसल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. नौदलाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार 7 एप्रिल रोजी एक खलाशी कोरोनाबाधित आढळल्यानंतर पश्चिम नौदल कमांडने संसर्ग झालेल्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी सुरू केली.
चिंताजनक...नौदलाच्या कोरोनाबाधित खलाशांचा आकडा 26 वर - कोरोनाबाधित खलाशी
कोरोनाचा संसर्ग जरी काही खलाशांना झाला असला तरी कोरोनाचे संक्रमण भारतीय नौदलाच्या कुठल्याही युद्ध नौकेवर किंवा पाणबुडीवर झाले नसल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे.
खलाशाची कोरोना चाचणी पाझिटिव्ह आल्याने, युनिटचा संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि बफर क्षेत्रे नियुक्त केली गेली आहेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वारंवार निर्जंतुकीकरण केले जात आहे. नौदल परिसरामधील इतर सर्व भागात टाळेबंदीची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येत आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना विलगीकरण आणि सुरक्षा नियमांचे पालन करायला लावले जात आहे. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे स्क्रिनिंग केले जात आहे.
भारतीय नौदलाच्या कोणत्याही जहाजावर, पाणबुडीवर किंवा हवाई तळावर कोरोना संसर्गाची अद्यापपर्यंत एकही घटना घडलेली नाही. नौदल हे लढाऊ-सज्ज, मोहिमेसाठी सक्षम असूनही साथीच्या आजाराशी लढा देण्याकरिता तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील मित्रत्वाचे संबंध असणाऱ्या शेजार्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेत भाग घेण्यास तयार आहे. पूर्वेकडील मलाक्काच्या सामुद्रधुनीपासून पश्चिमेकडील बाब-अल-मंडेब पर्यंतच्या समुद्री तटबंदीत व्यापलेल्या प्रदेशावर भारतीय नौदलाची गस्त अजूनही कायम आहे, तसेच नौदलाकडून व्यापारी जहाजांना आणि एडनच्या आखातातील चाचेगिरी विरोधात गस्त घालणाऱ्या पथकांना संरक्षण आणि आश्वासन प्रदान करण्यासाठी संकल्प हाती घेण्यात आला आहे, असे नौदलाने स्पष्ट केले आहे.