मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० या कालावधीत बारावीसाठी बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश पत्रिका (हॉल तिकीट) उद्यापासून (दि. 21 जाने.) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केली जाणार आहेत.
शिक्षण मंडळाकडून मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पत्रिका देण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, यंदापासून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा ही 18, फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना हे प्रवेश पत्रिका महाविद्यालयांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना त्याची प्रत उलब्ध करून, द्यावेत अशा सूचना शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी आज दिल्या आहेत.
हेही वाचा - सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा झाला सोनेरी, भाविकांसाठी दर्शन खुले
प्रवेश पत्रिका ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये. तसेच प्रवेश पत्रिकेची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांची, प्राचार्यांची स्वाक्षरी करून शाळा किंवा महाविद्यालयाचा शिक्का मारून द्यावे, अशा सुचनाही मंडळाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. प्रवेश पत्रिकेमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरूस्त्या असल्यास महाविद्यालयांनी विभागीय स्तरावर जाऊन दुरूस्त्या करून घ्यायच्या आहेत.
प्रवेशपत्रिका (हॉलतिकीट) हरवल्यास 'नो टेन्शन'
बारावीच्या परक्षेची प्रवेश पत्रिका गहाळ झाल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी दुसरी प्रत मिळणार असून यासाठी संबंधीत महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्रिका देण्याच्या सुचनाही मंडळाने केली आहेत. यामुळे आत्तापर्यंत प्रवेशपत्रिका हरवल्यानंतर जो त्रास विद्यार्थ्यांना होत हेाता त्यातून दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - संभाजीराजेंनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट, पर्यटनासाठी किल्ले जगाच्या नकाशावर आणणार