मुंबई:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चर्चेला तयार, पण सरकारकडून आमंत्रण नाही ? दरम्यान तुपकर यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. सरकारने तातडीने पावले उचलत मदतीची घोषणा केली. परंतु तुपकर यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राज्य सरकारने याची दखल घेत वाशिम आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे.
मुंबईत दाखल होणार:सरकारने दोन्ही जिल्ह्यातील १५७ कोटींचा निधी मंजूर केला. पण हा निधी अपुरा असल्याचा दावा करत तुपकर यांनी आंदोलनावर कायम आहे. त्यांनी आज रायगड येथून मुंबईकडे यायला प्रस्थान केले आहे. खोपोली येथून वाशी मार्गे ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्याबरोबर शेकडो गाड्यांचा फौजफाटा व कार्यकर्ते उपस्थित आहेत. सरकार चर्चेला तयार नाही. जर सरकार चर्चेला तयार असेल तर आम्ही सुद्धा चर्चेला तयार आहोत, असे त्यांनी सांगितलं आहे. परंतु शिंदे- फडणवीस सरकारकडून त्यांना अद्यापही कुठल्याही पद्धतीने चर्चेला आमंत्रण न गेल्या कारणाने ते या आंदोलनावर ठाम आहेत.