मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांकडून न्यायालयात BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता सह रिपब्लिक वृत्तवाहिनीचा सीईओ विकास खान चंदनी व BARC चा रोमिल रामगडिया यांच्याविरोधात 3600 पानांचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. हे अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोव्हेंबर 2020 मध्ये 12 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, पार्थो दासगुप्ता यास रिपब्लिक वृत्तवाहिनीचा संपादक अर्णव गोस्वामीकडून 12000 अमेरिकन डॉलर परदेशी ट्रीपसाठी देण्यात आले होते. याबरोबरच 40 लाख रुपये टप्प्याटप्प्याने पार्थो दासगुप्ता याला टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फॅमिली ट्रिप साठी 12000 डॉलर, 40 लाखांची रोकड
BARC चा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा दाखला व BARC च्या माजी कर्मचारी व काही केबल ऑपरेटर असे मिळून एकूण 59 जणांनी जबाब दिला आहे. पार्थो दासगुप्ता याने त्याच्या हाताने लिहून दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 2003 पासून तो अर्णव गोस्वामी यांना ओळखत आहे. टाईम्स नेटवर्कमध्ये दोघांनी एकत्र काम केले असल्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. रिपब्लिक वृत्तवाहिनी 2017 मध्ये अर्णब गोस्वामी यांनी सुरू केली होती. त्यानंतर टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी अर्णव गोस्वामी हा पार्थो दासगुप्ताच्या सतत संपर्कात होते.