महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघदेव पावला..! मुख्यमंत्री ठाकरे शब्दाला जागले, आरे आदिवासी पाड्यांमध्ये जल्लोष - आरे जंगलातील अदिवासी न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो शेड कांजूरला हलवण्यात येणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर आरे जंगलातील अदिवासींना जल्लोष केला. त्यांनी पारंपरिक नृत्य करत, एकमेकांना साखर वाटत आपला आनंद व्यक्त केला. तसेच अदिवाशींनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले.

tribals celebrate CM thackeray's decision on Aarey forest
वाघदेव पावला..! मुख्यमंत्री ठाकरे शब्दाला जागले, आरे आदिवासी पाड्यांमध्ये जल्लोष

By

Published : Oct 12, 2020, 2:29 PM IST

मुंबई - मुंबईतील आरे जंगलातील आदिवासी पाड्या-पाड्यांमध्ये काल (रविवार) दुपारपासून नाच-गाणी सुरू होती. तरुण-तरुणी, वृद्ध सर्व जल्लोष करत होते. कुणी वाघदेवाचे आभार मानत होते; तर, कुणी साखर वाटत होते. या जल्लोष नेमका कशासाठी होता, हे काही कुणी सांगायला नको. कारण कालपासून मुंबईत एकच चर्चा आहे ती म्हणजे आरेतून मेट्रो कारशेड कांजूरला हलवल्याची. तेव्हा या बातमीचा सर्वात जास्त आनंद हा आरेतील आदिवासी बांधवांना झाला. त्यामुळे काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत आदिवासी पाड्यात जल्लोष सुरू होता. 'वाघदेव' पावला...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शब्दाला जागले, अशा शब्दांत आदिवासी बांधव यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते.


मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) चे कारशेड आरेतील 33 हेक्टर जागेवर बांधण्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. या कारशेडमुळे आरे जंगल नष्ट होणार होते. तर आदिवासीचे जीवन धोक्यात येणार होते. त्यांच्या शेतीवर परिणाम होणार होता. शिवाय त्यांच्या यात जमिनीही जाणार होत्या. एकूणच ही परिस्थिती लक्षात घेता 2014मध्येच आदिवासीयांनी कारशेडला विरोध सुरू केला. प्रजापुरा पाडा तर या कामामुळे पूर्ण उद्ध्वस्त होणार होता. त्यामुळे आदिवासींनी पर्यावरणप्रेमींच्या बरोबर येत 'सेव्ह आरे'च्या माध्यमातून रस्त्यावरची आणि न्यायालीयन लढाई लढली. प्रसंगी प्रमिला भोईरसारखी आदिवासी महिला झाडे तोडण्यास विरोध करत तुरुंगात देखील गेली.

अखेर आदिवासींची ही लढाई यशस्वी ठरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतून कारशेड कांजूरमध्ये हलवल्याची घोषणा रविवारी दुपारी केली. या घोषणेनंतर सर्व पाड्यातील आदिवासी बांधव एकत्र जमले. मग सुरू झाला जल्लोष, तोही पारंपरिक पद्धतीने. तरूण-तरूणींनी ठेका धरत आदिवासी नृत्य सुरू केले. तर सर्वत्र साखर वाटण्यात आली. हा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती आरेतील आदिवासी रहिवासी आणि सेव्ह आरे सदस्य प्रकाश भोईर यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सत्तेत येण्याआधी आरे वाचवण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी खरा केला. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही त्यांनी यानिमित्ताने सांगितले.

आरे येथील आदिवाशींचा जल्लोष आणि प्रतिक्रिया...
आता आमचा प्रजापुरा पाडा नष्ट होणार नाही. तसेच आमची शेती आणि आमचे जीवनही धोक्यात येणार नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधव आज आनंदात आहे. आमचा वाघदेव आम्हाला पावला आहे. तेव्हा वाघदेवाचे ही आम्ही आभार मानले, असे भोईर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आता आरेची 800 एकर जागा संरक्षित करण्यात आली आहे. हाही महत्वाचा निर्णय आहे. पण आता मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण आरे वन म्हणून घोषित करावे आणि आदिवासीयांना ही संरक्षण द्यावे. जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. तसा आदिवासी जंगलाशिवाय राहू शकत नाही. तेव्हा आम्हाला आणि आमच्या जंगलाला पूर्णतः संरक्षण देण्यासाठी नक्कीच मुख्यमंत्री पाऊल उचलतील, अशी आशा आहे असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details