मुंबई : गुजरातमधील भरूच येथील या १८ वर्षीय तरुणीच्या हाताचा पंजा जन्मजात विकसित (हँड ऍप्लासिया) झाला नव्हता. या हातावर ग्लोबल हॉस्पिटल, परळ येथे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून सामियाला नवा हाथ देण्यात आला आहे. यामुळे येत्या काही काळात सामिया सामान्य नागरिकांप्रमाणे आपल्या हाताने काम करू शकणार असल्याची माहिती सीनियर कन्सल्टंट प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सतभाई यांनी दिली.
जयपूरपासून हाताचा शोध : गुजरातमधील भरूच येथील सामिया मन्सुरी या १८ वर्षीय तरुणीच्या उजव्या हाताचा पंजा जन्मजात विकसित झाला नव्हता. सामियाला चांगले हात प्रोस्थेसिस मिळेल याची खात्री करण्यासाठी कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न देखीले केले, मात्र ते यशस्वी झाले नाही. त्यांनी जयपूरसह अनेक शहरांना भेट देऊन हाताचे कृत्रिम अवयव शोधले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हाताचे कृत्रिम अवयव तिला कार्यक्षम हात देऊ शकणार नाहीत.
हात पूर्णपणे विकसित नव्हता : सामियाचा हात पूर्णपणे विकसित झालेला नव्हता. अविकसीत अवयवामुळे तिच्या उजव्या हाताच्या सर्व रक्तवाहिन्या, स्नायू, हाडे आणि नसा सर्वसामान्यांपेक्षा लहान होत्या. त्यामुळे शस्त्रक्रिया ही आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची होती. आम्ही हाताच्या कोपराकडील रक्तवाहिन्या आणि नसा त्यांच्या आकाराशी जुळण्यासाठी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. जसजसा मज्जातंतू कार्यरत होईल तसतसे रुग्णाची कार्यक्षमता वाढेल. तिला पूर्णपणे कार्यक्षम हात मिळण्यासाठी सुमारे ९-१२ महिन्यांचा कालावधी लागेल. सामियाला घरी सोडण्यात आले असून सर्व वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी याविषयी रुग्ण आणि तिच्या पालकांना माहिती दिली आहे, अशी माहिती डॉ. सतभाई यांनी दिली.
इंदोरच्या महिलेचा अवयव दानाचा निर्णय : यानंतर कुटुंबीयांनी हात प्रत्यारोपणासाठी ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉ. सतभाईंचा सल्ला घेतला. समुपदेशनाच्या अनेक सत्रांनंतर डॉ. सतभाई आणि त्यांच्या टीमने सामियाच्या प्रत्यारोपणाची तयारी सुरू केली. तत्पूर्वी ती १८ वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे ठरवले. १८ वर्षांची झाल्यावर, १० जानेवारी रोजी सामिया शारीरिक आणि कायदेशीररित्या हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी करण्यास पात्र ठरली होती. इंदोरमधील ५२ वर्षीय महिलेच्या कुटुंबाने सामियासाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या महिलेचे हात प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाल्याचे कळताच आणखी विलंब न करता सामियाला तातडीने ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. सतभाई यांनी दिली.