मुंबई -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्बल घटकातील लोकांना पुन्हा आर्थिक संकटांना समोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या समोर अनेक संकटे उभी ठाकली आहेत. मात्र त्यांच्या मदतीसाठी किन्नर माँ समाज धावून आला आहे. या संस्थेच्या वतीने तृतीयपंथी, पोस्टमन आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिधावाटप करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीमुळे तृतीयपंथीयांना मोठा आधार मिळाला आहे. किन्नर माँ समाजाकडून समाजातील दुर्बल घटकातील लोकांसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.
'या' गरजवतांना केली मदत
लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांचे हाल होऊ नये, यासाठी पुन्हा एकदा धान्य वाटप आणि विविध वस्तूंचे वाटप संस्थेकडून करण्यात आले आहे. तृतीयपंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, पोस्टमन यांना देखील या संस्थेने मदतीचा हात दिला आहे. किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सलमा खान यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊन काळात किन्नर, वेश्या, गरजू लोकांना राशन किट, मास्क, सॅनिटायझर वाटप करून सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. या संस्थेच्या माध्यमातून भांडुप आणि घाटकोपर परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना राशन किट, मास्क, सॅनिटायझर वाटप केले. तसेच येथील पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा राशन किट, मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे.