मुंबई-पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानक ‘ग्रीन स्थानक’ म्हणून तयार केले जात आहे. येत्या काळात पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर पर्यावरणपूरक सामग्रीचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच 'ग्रीन स्थानक' करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर सौरऊर्जा प्लेट बसविण्याचे कामही सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे स्थानक होणार ‘ग्रीन स्थानक’ : पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाचा उपक्रम - ग्रीन स्टेशन न्यूज
पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. रेल्वेत वापरण्यात येणाऱ्या एकूण विजेपैकी काही प्रमाणात वीज ही सौर किंवा हरित उर्जेच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेकडून करण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन
पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आणि संवर्धनासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच 'ग्रीन रेल्वे स्थानका'साठी प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने २५ रेल्वे स्थानकात प्लास्टिक बॉटल क्रशर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी मुंबई सेंट्रल स्थानकात ३ मशीन बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित १५ रेल्वे स्थानकांतही क्रशर मशीन कार्यान्वित करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक स्थानकावर सौरऊर्जा प्लेट बसविण्याचे काम सुरू आहे. मुंबई टर्मिनस येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवला जात आहे. यासह वांद्रे येथे पाणी पुनर्वापर प्रकल्प सुरू आहे. मुंबई विभागातील विहिरी पुनर्जीवित केल्या जात असल्याची माहिती माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्लास्टिक मुक्त रेल्वे स्थानक-
पश्चिम रेल्वेने प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन बसविण्यात आली आहे. चर्चगेट ४, लोअर परळ १, प्रभादेवी १, दादर २, माटुंगा रोड १, माहीम १, वांद्रे १, वांद्रे टर्मिनस २, अंधेरी २, मालाड १, कांदिवली १, बोरिवली २, वसई रोड १, नालासोपारा १ आणि विरार १ या स्थानकांवर मशीन सुरू करण्यात येत आहेत. प्लास्टिकचा कचरा पर्यावरणपूरक पद्धतीने कमी करणे, त्याचा पुर्नवापर करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश रेल्वे मंडळाने दिले आहे.
प्रवाशांना पर्यावरणपूरक वातावरण-
ग्रीन स्थानकात पाणी, वीज वाचविण्यावर भर दिला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे विघटन केले जाते. स्थानकांच्या आकारानुसार त्यांना ग्रीन करण्यासाठी अवधी लागेल. ग्रीन स्थानकमुळे पश्चिम रेल्वेला थेट कोणताही महसूल मिळणार नाही. मात्र, पाण्याचा पुनर्वापर, सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे पैशांची बचत होईल आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल. तसेच प्रवाशांना पर्यावरणपूरक उत्तम सुविधाही मिळेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
भारतीय रेल्वेकडून प्रयत्न-
पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. रेल्वेत वापरण्यात येणाऱ्या एकूण विजेपैकी काही प्रमाणात वीज ही सौर किंवा हरित उर्जेच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेकडून करण्यात येत आहे. त्याच प्रयत्नामधून ग्रीन स्थानक ही संकल्पना पुढे आली. यामध्ये प्लास्टिक वस्तूंचा वापर बंद करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे एक्सप्रेसमध्ये, रेल्वे स्टॉलवर आता कागदी कप दिसून येत आहेत.