कसारा-इगतपुरी दरम्यान घसरलेली मालगाडी पुन्हा रुळावर मुंबई Train Derailed : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे दोन डबे रविवारी (10 डिसेंबर) रात्री रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघाताचा परिणाम कसारा-इगतपुरी सेक्शनवरील गाड्यांच्या वाहतुकीवर झाला. तसंच मालगाडीला रुळावर परत आणण्याचं काम पुर्ण होईपर्यंत तात्पुरत्या मेल एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या होत्या. दरम्यान, आज (11 डिसेंबर) सकाळी कर्मचारी, अभियंते अन् अधिकारी यांच्या सहकार्यानं रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली.
तांत्रिक कारणामुळं मालगाडी रुळावरुन घसरली. परंतु रात्रीच अनेक अभियंते, कर्मचारी, प्रशासकीय मंडळी सर्वांनी एकजुटीनं काम करत गाडीला पुन्हा रुळावर आणले. आता सर्व मेल एक्सप्रेस ट्रेन आपल्या पूर्वनियोजित रेल्वे मार्गावर धावण्यास सुरुवात झालेली आहे.- रजनीश गोयल, मुख्य महाप्रबंधक, मध्य रेल्वे
मेल एक्सप्रेस पूर्वनियोजित मार्गावर धावण्यास सुरुवात :रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनूसार, तांत्रिक कारणामुळं मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले होते. त्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक रजनीश गोयल यांच्यासह मध्य रेल्वेचे कर्मचारी, अभियंते अन् अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसंच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळं रात्री सुमारे 21 मेल एक्सप्रेसचे मार्ग वळवण्यात आले होते. अखेर आज पहाटे 7 वाजेच्या सुमारास मालगाडीच्या डब्यांना रुळावर आणण्यात आलं. त्यानंतर सकाळी 8:30 वाजेपर्यंत सर्व मेल एक्सप्रेस पूर्वनियोजित डाऊन मार्गावर धावण्यास सुरुवात झाली.
सकाळी 7 वाजून 50 मिनिटाला इगतपुरी दिशेकडं जाणारा रेल्वे मार्ग खुला झाला. याच रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली होती. आता काम पूर्वपदावर आलेलं आहे. रात्री काही मेल एक्सप्रेस तात्पुरत्या स्वरूपात इतर मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. आता मुंबईहून निघणाऱ्या आणि मुंबईकडं येणाऱ्या मेल एक्सप्रेस ट्रेन पुन्हा आपल्या मार्गावर धावतील.- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
हेही वाचा -
- कसाराजवळ मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले, 'या' गाड्यांच्या मार्गात बदल
- Suheldev Express Derailed : सुहेलदेव एक्सप्रेस रुळावरून घसरली; सुदैवानं टळला मोठा अपघात
- Jan shatabdi express derail: चेन्नईमध्ये जनशताब्दी एक्स्प्रेस रुळावरून घसरली, सुदैवाने प्रवासी सुखरुप