मुंबई : गेल्यावर्षी 2022 मध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या 19 हजार पाचशे 49 वाहनांवर, तर 2023 मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंत 1 हजार 750 वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट वापरल्याने, वाहतूक पोलिसांनी कारवाई करून दंड आकारला आहे. प्रवीण पडवळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली. फॅन्सी नंबर प्लेट वापरण्यावर चाप बसवण्यासाठी मुंबईतील नंबर प्लेट बनवणाऱ्या सर्वांची बैठक घेतली आहे. त्यांना फॅन्सी नंबर प्लेट बनवून देऊ नये असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे जे वाहनधारक फॅन्सी नंबर प्लेट बनवून घेण्यासाठी या लोकांकडे येतील, त्यांनी वाहनाचा नंबर, रजिस्टर नंबर, वाहन कोणाच्या नावावर आहे. तसेच वाहन धारकाची सर्व माहिती एका रजिस्टरमध्ये लिहून घेण्यास वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदेशीर :मोटार वाहन कायदा 1988 तसेच मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट वाढत आहे. दादा, मामा, काका, साई, राम, पवार अशा नावांचे नंबर जुळवलेली वाहने वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. जे अशा प्रकारच्या नंबर प्लेट वापरातील त्या वाहनधारकासांठी महाराष्ट्र पोलिसांची ही धोक्याची घंटा आहे. असे वाहन वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबरप्लेट फॅन्सी आहेत, अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहीम राबवली आहे.