मुंबई - राज्यात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करीत वेगवेगळ्या शहरात ई-चालान 2016 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. मात्र, हेच ई-चालान आता वाहतूक पोलिसांच्या डोकेदुखीचा विषय ठरला आहे. 2016 पासून सुरू झाल्यापासून भरलेली दंडाची रक्कम चक्क 1 हजार कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम वसूल करण्याची कोणती तरतूद नसल्याने हा आकडा आणखी वाढत जात आहे.
वाहतूक पोलीस म्हणजेच वाहतूक विभागात होणारा भ्रष्टाचार रोखण्याकरता डिजीटल दंड म्हणजेच 'ई-चालान' मार्फत दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ई-चालानामुळे वाहतूक विभागाचा भ्रष्टाचार कमी झाला आहे. मात्र, वर्ष 2019 मध्ये ई-चालान मार्फत ठोठावलेला दंड तब्बल 298 कोटी रुपये भरण्यातच आलेला नाही. यामुळे ट्रॅफिक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत राज्यात राज्यात वाहतूक पोलीस विभागाकडून सीसीटीव्ही, ई-चालान डिवाईस आणि टोईंगच्या माध्यमातून 1 कोटी 39 लाख 21 हजार 364 चलन ठोठावण्यात आले आहेत. चलन दंडाची रक्कम 450 कोटी 54 लाख 2 हजार 810 रुपये इतकी आहे. मात्र, यापैकी फक्त 53 लाख 38 हजार 593 चलानांचा दंड 152 कोटी 36 लाख 48 हजार 906 रुपये रक्कम कारवाई झालेल्यांनी भरली आहे. तब्बल 85 लाख 82 हजार 772 चालानांची 298 कोटी 17 लाख 53 हजार 904 रुपये रक्कम अजूनही वाहन चालकांकडे बाकी आहे.
हेही वाचा -महापालिका बजेट आज; मुंबईकरांना काय मिळणार याकडे लक्ष