मुंबई- महाराष्ट्रातील विविध शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यात तब्बल 40 लाखाहून अधिक ई-चलनाची दंडात्मक रक्कम अद्याप वसुल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. एवढी मोठी रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक विभाग विशेष मोहीम राबविणार आहे. या संबंधीचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक महामार्ग पोलिस यांनी राज्यातील वेगवेगळ्या वाहतूक पोलीस विभागाला दिले आहेत.
144 कोटी रुपयांचा ई-चलान दंड वसूल करण्याचे वाहतूक पोलिसांना आव्हान - वाहतूक पोलिसांना
गेल्या सहा महिन्यात तब्बल 40 लाखाहून अधिक ई- चलनाची दंडात्मक रक्कम अद्याप वसुल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. एवढी मोठी रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक विभाग विशेष मोहीम राबविणार आहे.
२०१६ साली प्रथम मुंबईत हा प्रकल्प राबविण्यात आला. यानंतर टप्याटप्प्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक शहर, जळगाव, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर येथे ई-चलान पद्धत सुरू करण्यात आली. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकाविरोधात कारवाई करताना त्याचा वाहन क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून हेरून वाहन मालकाच्या मोबाइलवर ई-चलान पाठवली जाते. चालकाला दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा जवळच्याच वाहतूक पोलीस चौकीत भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पण तरीसुद्धा करोडो रुपयांचा दंड थकवला गेला असल्याने आता वाहतूक विभाग हा दंड वसूल करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
जानेवारी 2019 पासून राज्यातील विविध शहरात आत्तापर्यंत तब्बल 204 कोटींचे ई-चलन करण्यात आले आहे. यामध्ये वाहने वेगाने चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, कॉर्नर पार्किंग किंवा पार्किंग नसलेल्या ठिकाणी वाहन उभे करणे, झेब्रा क्रॉसिंगपुढे वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे आणि हेल्मेट न घालणे या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.
एकूण 204 कोटी दंडात्मक रकमेपैकी केवळ 60 कोटी रुपये वसूल झाले आहेत. मात्र, उरलेले 144 कोटी रुपये वसूल करण्यासाठी वाहतूक विभागाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.