मुंबई- शहरातील वाहतूक कोंडीला वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच प्रशासन आणि वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचे वारंवार समोर आले आहे. यातच एमएमआरडीएने रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी जागृतीनगर मेट्रो जवळील घाटकोपरकडे जाणारी एकेरी वाहतूक नुकतीच बंद केली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
घाटकोपर-अंधेरी जोड रस्त्यावर वाहतुकीची मोठी रहदारी असते. हा रस्ता पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते. ते काम एमएमआरडीएने सुरू केल्याने या मार्गावर असलेल्या जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळ अजून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.
जागृतीनगर मेट्रो जवळील घाटकोपर कडे जाणारी एकेरी वाहतूक बंद एमएमआरडीएने जुन्या घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर अचानकपणे घाटकोपरकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. तसेच या मार्गावर फक्त अंधेरीकडे येणारी एकेरी वाहतूक सुरू रहाणार आहे. मात्र असे करताना एमएमआरडीएकडून कुठलीही पूर्व सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूक व्यवस्था ढिसाळणार असल्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या या ढिसाळपणावर आता या भागातील नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
एमएमआरडीएच्या ढिसाळपणामुळे ही अवस्था
जागृती नगर मेट्रो स्थानक निर्माण झाल्यावर या रस्त्याचे दोन विभाजन झाले होते. एक रस्ता थेट श्रेयस सिग्नल वरून पूर्व द्रुतगती मार्गाला जाऊन मिळतो. तर जुना मार्ग पारशीवाडी, जागृती नगर, माणिकलाल इस्टेट मार्गे लाल बहादूर शास्त्री मार्गाला जावून मिळतो. एमएमआरडीएने जेव्हा मेट्रो सुरू झाली तेव्हाच या नव्या रस्त्याचे संपूर्ण काम करणे गरजेचे होते. मात्र एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे बाळासाहेब ठाकरे चौक ते जागृती नगर मेट्रो स्थानकापर्यंत या मार्गावर पूल उभे करण्याचे काम गेले सहा वर्ष रखडले गेले. हा पूल जुन्या मार्गावरून होणार असल्याने याचे काम त्वरित संपविणे गरजेचे होते. परंतु एमएमआरडीएने गेले अनेक वर्ष या कामाकडे दुर्लक्ष केले.
आता अचानक एमएमआरडीएला जाग आली असून त्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. हा मार्ग बंद केल्याने काजूटेकडी, पारशीवाडी, माणिकलाला इस्टेट, जागृती नगर अश्या मोठ्या लोकवस्तीला त्याचा फटका बसणार आहे. परिणामी राहिवाश्यांना काही मीटर अंतरासाठी दीड ते दोन किलोमीटर अंतर कापून यावे लागणार आहे.