मुंबई: 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे असंख्य अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. 14 एप्रिलला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी काही रस्ते बंद ठेवले असून पर्यायी रस्त्यांची सोय करून देण्यात आली आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतुक कोंडी होण्याची शक्यता:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असंख्य अनुयायी 13 एप्रिलपासुन ते 14 एप्रिल पर्यंत मोठया प्रमाणात चैत्यभूमी, दादर येथे दर्शनाकरिता येतात. या पार्श्वभुमीवर चैत्यभूमी व आसपासच्या परिसरात 13 व 14 एप्रिला वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरीता पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी आदेश दिले आहे. 13 एप्रिल दुपारी 11:00 वाजल्यापासून 14 एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर परिसराकडे जाणाऱ्या खालील रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यात येणार आहे.
एक दिशा मार्ग व वाहतुकीसाठी बंद रस्ते : एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोतृगिज चर्च पर्यंत एक दिशा मार्ग राहिल. म्हणजेच पोतृनिज चर्च येथून एस. के. बोले रोडवर सिध्दीविनायकच्या दिशेने प्रवेश बंद राहणार आहे. तसेच स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँक पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहणार आहे. तरी स्थानिक नागरीकांची वाहने शिवाजी पार्क रोड नं. ५ म्हणजे पांडूरंग नाईक मार्गाने जाऊ शकतील. रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस. व्ही. एस. रोड जंक्शन पासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद केला आहे. सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने, नाहिन जंक्शन येथून एस. जे. रोड मार्गे वळविण्यात आली आहेत.