मुंबई - मनातील वाईट विचारांना जाळून राख करावी, या कल्पनेतून होळी उभारली जाते. मुंबईतही गल्लोगल्लीत होळी जाळून वाईट सवयींना सोडण्याचा संकल्प करण्यात येतो. येथील वरळी, चेंबूर, माहीम, वर्सोवा, खारदांडा येथील कोळीवाड्यात पारंपारिक वातावरणात होळी साजरी केली जाते. कोळीवाड्यासह अन्य भागातही होळीचा उत्साह दिसून आला. तसेच माहीम कोळीवाड्यात होळीसह पारंपरिक सण टिकले पाहिजे, असा सामाजिक संदेशही देण्यात आला.
माहीम कोळीवाड्यात होळीचा एक वेगळा प्रकारचा माहोल असतो. प्रत्येक गल्लीत उंच होलिका उभारण्यात येते. ३ दिवस हा सण धामधुमीत साजरा केला जातो. होळीच्या एक दिवस आधी सुपारीच्या झाडाचे खोड होळीसाठी पारंपारिक वाद्यांनी आणले जाते. त्यानंतर हळद लावली जाते. आंघोळही घातली जाते. साडी नेसवून नटवले जाते. देवीचा मुखवटा चढवून झाल्यावर होलीका भोवती महिलांचे नृत्य होते.